Sunday, March 29, 2020


पोट आणि जीव !
‘पोट आणि जीव’ माणसाला कोणत्या थराला पोहोचवतील हे सांगता येत नाही. पोटासाठी शहराकडे वळलेली पावलं आता जीव वाचविण्यासाठी गावाकडे पळताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केलं गेलं, त्याला आज चार दिवस झाले. या लॉकडॉऊनची पूर्वतयारी शासकीय पातळीवरुन निटशी केली नसल्याचा फटका अनेकांना बसत आहे. बांग्लादेशाने “ 26 फेब्रुवारीपासून लॉकडाऊन केले जाईल त्यामुळे ज्यांना गावाला परत जायचंय त्यांनी जा” असे नागरिकांना सुचविले एवढेच नव्हे तर त्यासाठी सुविधाही निर्माण करुन दिल्या. तसं भारतानेही कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्या नागरीकांना सुविधा निर्माण करुन दिल्या, पण त्या परदेशात अडकलेल्यांना ! पैशासाठी आपला देश सोडून परदेशात जाणारे आणि त्याच पोटासाठी आपलं गाव सोडून शहरात आलेले या दोन्हींमध्ये हा मोठा तर फरक केला सरकारने. त्यांच्यासाठी खास विमानं पाठविली मात्र जे इथल्याच शहरात अडकले त्यांना वाऱ्यावर सोडलं ! घर की मुर्गी डाल बराबर ?
लॉकडाऊनमुळे दुहेरी मरण। ज्या पैशासाठी शहरात पाऊल टाकलं तो आता मिळणार नाही, आणि  दुसरं म्हणजे कोरोनाची आपल्याला लागण होईल, त्यातून वाचलोच तर भूकमरी होईल असा विचार करुन अनेकांना गाव आठवला. सर्व वाहतुक व्यवस्था बंद केलेली, ज्यांच्याकडे स्वत:च्या दुचाकी गाड्या होत्या त्यांना पोलीसांच्या ‘कडक’ अंमलबजावणीचा फटका बसला, आणि ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्याने सरळ चालत जाण्याचा पर्याय निवडला. अनेकांनी दिल्ली ते बिहार, दिल्ली ते उ.प्र. असा दोनशे तीनशे किमीचा प्रवास बायका पोरांना घेवून पायी करण्यास सुरुवात केली. हीच परिस्थीती प्रत्येक शहराची दिसत आहे. महाराष्ट्रात या अशा प्रयत्नात आज सात नागरीकांनी जीव गमवला, जीव वाचविण्याची धडपड जीवच घेवून गेली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन गुजरातला चालत निघालेल्या सात मजुरांना एका औषधं भरलेल्या ट्रकने चिरडले. त्यात चार मजूर जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत, तसाच प्रकार पूण्याहून मोटरसायकलने निघालेलं शाहुवाडी तालुक्यातील एक कुटूंब  (नवरा-बायको व सहा वर्षाचा मुलगा) कराडमध्ये झालेल्या अपघातात खलास झालं. मुंबईहुन सोळाजणांनी चक्क जलवाहतुकीचा सहारा घेतला. मच्छीमार नौका चालकाला तब्बल 80 हजार रुपये देवून या मंडळीने मुंबई ते गुहागर असा जीवघेणा प्रवास केला. दुधाच्या टँकरमध्ये लपून बसून (दुध भरतात त्या कंटेनरमध्ये बसून) राजस्थानकडे जाणारे तब्बल बारा लोकं पालघरमध्ये पकडले गेले, तर वाशीममध्येही टँकरने प्रवास करणारेही पकडण्यात आले, कुणी चालत, सायकल, कुणी मोटरसायकल, कुणी बैलगाडी किंवा जमेल तसं गावाकडे सैरावैरा पळत आहे !
हे खरं तर शासकीय अव्यवस्थेचे पुरावे आहेत, केंद्र सरकारने 22 तारखेला एक दिवसाचा लॉकडाऊन ‘साजरा’ केला खरं तर त्याचवेळी याचा विचार करायला हवा होता, महाराष्ट्र शासनाने तर त्यापूर्वीच 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता मात्र या नागरीकांचा ना राज्याने विचार केला न केंद्राने ! प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर करण्यास उशीर झाल्याचा आणि लोकांना शासनाच्या व्यवस्थेवर विश्वास नसल्याचा हा परिणाम आहे, “सरकार क्या है, बडो का ख्याल करती है, हम गरीबन को कौन देखता है साहब, बडो को खाना लगता और हम क्या हवा पे जिते है क्या ?” अशी दिल्लीहून जेमतेम एक वर्षाच्या बाळाला घेवून बिहारकडे चालत जाणाऱ्या नागरीक महिलेची प्रतिक्रीया बोलकी आहे. सर्वांसाठी अन्न देण्याची योजना जाहीर करण्यापूर्वीच अशा अनेकांनी प्रवास सुरु केला होता.
      शासनाने लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं. एरव्ही शासन करदात्यांचे हजारो करोड रुपये स्वत:ची जाहिरात करण्यासाठी खर्च करत असते, मात्र यावेळी तसं काही दिसलं नाही. शासनाने जर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्या आयटीसेलचाही वापर केला असता तरी बरं झालं असतं, पण शासनाला भान राहिलं नाही हेच यातून दिसतं. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडेही प्रसिद्धी विभाग आहेत ते काय लोणचं घालायला ?
      संकट आलं की गावाकडची लोकं शहरातील माणसाकडे (बऱ्यांचदा) हात पसरतात, आता शहरातील माणसं गावाकडे धावत आहेत, गाववाले मात्र त्यांना अस्पृशांसारखी वागणूक देत आहेत, यात सावधतेचा भाग असेही पण सरकारनेच त्यासाठी पावलं उचण्याची गरज आहे.
      पोट आणि जीव यांची चिंता लोकांना नेहमीच असते हैराण करत असते, या क्षणाला प्राधान्य कोणाला द्यायचं असा प्रश्न लोकांना पडलेला आहे, जीव की पोट ! शासनाच्या योजनेतून खरंच पोट भरलं तरी कोरोनापासून जीव कसा वाचवावा अशी त्यांची विवंचना आहे !!
प्रसंग बाका आहे, आता राज्य शासनाला जाग आली आहे त्यांनी लोकांना आहे तेथेच थांबण्याचे आवाहन केले आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचणार कसे ? पोलीसांच्या भीतीने मिळेल त्या आडमार्गाने अनेकजण केव्हाच मार्गस्थ झालेत…!


No comments:

Post a Comment