एकवीस दिवसांचा बंदीवास !
जगातील सर्वेात्तम आरोग्य सेवा असलेल्या देशांच्या यादीत
दुसऱ्या क्रमांकावर असलेला केवळ सहा कोटी लोकसंख्या असलेला इटली हा देश कोरोनापूढे
पूरता आडवा झाला आहे, भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे आरोग्य सेवेच्या यादीत जगात
112 व्या क्रमांकावर आहे. जेथे कोरोनापूढे इटली आडवी झाली तेथे भारताची काय अवस्था
होईल हे लक्षात घ्यायला हवं. सरकारं आपल्या परिने सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र
ज्या जनतेच्या जीवासाठी हे चाललंय त्या जनतेला खरंच याचं काही गांभिर्य आहे का ? महाराष्ट्रातच
नव्हे तर देशात ठिकठिकाणी अशा मुर्ख नागरीकांचे दर्शन झाले. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी
लागणाऱ्या सुविधा व मनुष्यबळ यांचा आधीच तुटवडा आहे अशा वेळी नागरीकांकडून काही पथ्य
पाळण्याची गरज आहे. कोरोना होण्यापूर्वी आपण त्याला रोखू शकतो ही खुप मोठी शक्ती आहे,
म्हणूनच सरकारांनी ‘घरातून बाहेर पडू नका’ असा संदेश नागरीकांना दिलाय. मात्र अनेक
शिकले सवरलेले लोक सर्रास बाहेर पडताना आजही दिसले. नागपूरच्या सिव्हील लाईन्समध्ये
काही कमी शिकलेले लोकं राहतात ? तीथले काही दिड शहाणे तर आज मॉर्निंग वॉक साठी ग्रुप्सनी
बाहेर पडले होते, पोलिसांनी हात जोडूनही थांबले नाहीत. पिलिभीतीमधील आयएएस डीएम व आयपीएस
एसपी हे अधिकारी रॅली काढून शंखनाद व घंटानाद करताना दिसले. हे खरोखरच बौद्धीक दिवाळखोरीचं
लक्षण आहे. आजही कोरोना आटोक्यात आहे, विचार करा जर तो शहरांतील झोपडपट्टयांत घुसला
तर काय होईल ? अनेक गावांनी, जिल्ह्यांनी आपल्या सिमा सील केल्या आहेत, कुणाही बाहेरच्या
व्यक्तीला किंवा गावातीलच पण शहरातून परतणाऱ्या व्यक्तीलाही ते गावात येवू देत नाहीत,
यायचेच असले तर तपासणी करूनच घेतात, अशा वेळी शहरात राहणारी शिकली सवरलेली माणसं मुर्खासारखी
का वागत आहेत ? हातावर पोट असलेल्यांचं समजू शकतो पण ज्यांची पोटं सुटलेली आहेत त्यांचा
मेंदूवरचा ताबा का सुटलाय ?
प्रधानमंत्री मोदी यांनी आज जे आवाहन केले ती खरतर कळकळीची
विनंतीच होती. पहिल्यांदा त्यांच्या बोलण्यात सच्चाई झळकली. अगामी महासत्ता असल्याचा
परिचित असा वृथा अभिमान नव्हता. नाईलाज म्हणून 21 दिवसांचा लॉकडाऊन करावा लागला आहे.
मी तर म्हणतो सरकारने यापूढे जावून आणखी कडक पावलं उचलायला हवीत, जो कुणी विनाकारण
रस्त्यावर येईल त्याला चांगलंच चोपायला हवं, अगदी रँडसारखं धोरण राबवीलं तरी हरकत नाही.
( रँड हा भारतीय इतिहासातील खलनायक ) त्याने प्लेगच्या काळात टिळक आदींचा विरोध डावलून
लसीकरणाची मोहिम राबविली होती. त्यात केलेल्या अतिरेकामुळे त्याचा बळी गेला, ती गोष्ट
वेगळी. पण तेवढा अतिरेक वगळता सरकारने रँड प्रमाणे पावलं उचलली पाहिजेत असंच वाटतं
या पढतमुर्खांचे घातकी वर्तन पाहून, ही माणसं म्हणजे मानवी बॉम्बच आहेत जणू.
किमान या काळात तरी सर्वच नागरीकांनी राजकीय, सामाजीक वा
आर्थिक असा कोणताही भेद न बाळगता आलेल्या संकटाचा मुकाबला करायला हवा. काही भक्त मंडळीने
याही काळात विषारी प्रचार सुरु ठेवलेला आहे, एका धर्माला टार्गेट करणारे संदेश अजूनही
सुरु आहेत, काहींनी याही परिस्थितीत मोदींचा प्रचार सुरु ठेवला आहे, तर काहींनी मोदींचा
विरोध सुरुच ठेवला आहे हे सर्व करण्याची ही आता वेळ नाहीय. आपले सरकार, पोलीस यंत्रणा,
आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील सर्व नागरीक यांच्या पाठीशी उभं
राहण्याची ही वेळ आहे. काही व्यापाऱ्यांनी तर लोकांची गैरसोय लक्षात घेवून भाववाढ केली
आहे, मुंबईमध्ये पाच लाख मास्क पकडण्यात आले ही व्यापारी मंडळी मेलेल्याच्या टाळूवरील
लोणी खाणारीच आहेत.
आता देशाला अत्यंत गंभीर परिस्थिती 21 दिवसांचा बंदीवास भोगावा
लागणार आहे. माझ्या सारखी माणसं जी घरापासून खुप दूर एकटी आहेत, त्यांची मानसिक अवस्था
बिकट होणार आहे ( माझ्याकडे ‘पुस्तक’ नावाचा मित्र असल्याने मला थोडा कमी ताण राहिल),
त्यांच्यासाठी तर हा काळ खुपच तणावाचा राहाणार आहे, घरी काही घडलं तर धावूनही जाता
येणार नाही, जे आजारी आहेत, गरोदर आहेत, जे मुळातच आर्थिक संकटात आहेत, ज्यांचं पोटच
रोजच्या रोज मिळणाऱ्या रोजगारावर चालतं त्यांनाच नाही तर जे स्वत:च्या कुटूंबात आहेत,
ज्यांच्याकडे आर्थीक सुबत्ता आहे, जे निरोगी आहेत अशा सर्वच लहान-थोरांसाठी हा बंदीवास
भयंकर असणार आहे. पण कोरोनाचा महाभयंकर प्रकोप टाळण्यासाठी तेवढं तरी सहन करावंच लागणार
आहे. आपण सर्वांनीच हा निर्धार करुया, सर्वांना हा 21 दिवसांचा बंदीवास सहन करण्याची
ताकद प्राप्त होओ, आणि एकदा कोरोना नावाचे संकट टळो एवढीच सदिच्छा ! बाकी प्रधानमंत्री
जे म्हणाले तेच ‘जान है तो जहान है’!
No comments:
Post a Comment