Sunday, January 15, 2012

जातीयता सर्वात मोठा भ्रष्टाचार अण्णा आता कसला करता विचार


 

भ्रष्टाचाराविरुध्द लढण्यासाठी धोतर खोचून उभे ठाकलेले, बाह्या सरसावून धावणारे, आणि टोपी संभाळत उडया मारणारे देशभक्त, समाजसेवक, राष्ट्ररक्षक आता कुठल्या बिळशाखेत टोपीबरोबर तोंडही काळ करुन बसले आहेत कोण जाणे ? खरेतर त्यांनी आता वंदे मातरमचा नारा देण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या ठिकाणापासून केवळ 8 किमी. अंतरावर असलेल्या मुळगाव या गावात एका दलित मातेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आले तसेच तिची धिंड काढण्यात आली. तिचा दोष एवढाच की तिने मानीत सवर्णाच्या मुलीबरोबर प्रेम करणाऱ्या मुलाला जन्म दिला ! मातंग समाजातील या मातेवर गुजरलेल्या प्रसंगामुळे समाजात आजही मनुवाद किती मातलेला आहे हे दिसून आलेच शिवाय अण्णा हजारेंसारखे समाजसेवक व भारत माता की जय म्हणणारे अशा प्रसंगी ताेंडांचं बोळकं झाल्यासारखे सारखे राहातात हेही पुन्हा एकदा दिसून आले.

महाष्ट्राच्या समाजकारणात क्रांतीकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव सतत घेतले जाते. तरीही त्यांची नात जातीच्या जात्यात भरडून निघाली यावरुन पुरोगामीत्वाचा टेंभा मिरविणारा महाराष्ट्र किती प्रतिगामी आहे  हे दिसून येते. ती महिला अण्णाभाऊंची नात आहे म्हणूनच तिच्यावर झालेला अत्याचार मोठा आहे असे नाही त्याजागी कोणतीही महिला असती तरीही हे निंदनीयच आहे . लक्ष्मण ढोबळे नावाचा प्राध्यापक असलेला मंत्री जेव्हा अप्रत्यक्षपणे या निंदनीय घटनेचे ढोबळमनाने समर्थन करुन मुर्खपणाची लक्ष्मणरेषा पार करतो, ज्याच्या जिल्ह्यात ही घटना घडली तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या गंभिर प्रकरणी शेपटी घालून बसतो, उत्तरप्रदेशमध्ये भट्टा पारसौल येथील कथित बलात्कार प्रकरणामुळे उत्तरप्रदेश मध्ये येण्याची लाज वाटते असे बरळणारा काँग्रेसचा युवराज महासचिव राहुल गांधी जेव्हा काँग्रेसच्या राज्यात खुद्द मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात अशी दलित महिलेची विटंबना झालेली असताना तोंड बंद ठेवतो तेव्हा या सर्वांचे दलित प्रेम किती बेगडी आहे हे दिसून येते. ही सर्व मंडळी राजकीय आहेत त्यांच्याकडून तशी फारशी अपेक्षाही  नाही , पण . . . . !

रामदेव बाबांच्या तोंडावर एका व्यक्तीेने काळी शाई उठविली. तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला ही घटना घडताच अण्णा हजारे यांनी तोंड उघडले. हे कृत्य लोकशाही विरोधी असल्याची प्रतिक्रीया त्यांनी लगोलग दिली. पण तोच अण्णा स्वत:च्याच राज्यातील दलित मातेला विवस्त्र करुन मारहाण करण्याच्या घटनेवर भाष्य करण्याऐवजी कोठे गन्ना चोखत बसला होता कोण जाणे ? अण्णा हजारे हे भ्रष्टाचाराविरुध्द लढत आहेत त्यामुळे  त्यांनी या घटनेवर प्रतिक्रीया दिलीच पाहिजे असे कुठे असा युक्तीवाद काही समर्थक करतील. तर त्यांचा युक्तीवाद हा पळवाट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण म्हणजे जातीभेद हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. याच मनुवादी जाती परंपरेने आपल्या देशाचं पूर्वीही वाटोळं केलं व आजही करीत आहे. देश वाचवायचा असेल तर सर्वात प्रथम हा भ्रष्टचार नष्ट करावा लागेल. आणि अण्णा यांनी देश वाचविण्यसाठी भारत माता की जय ची घोषणा केली. एक माता जेव्हा अशी विटंबीत होते तेव्हा या पुत्राचे रक्त सळसळत नाही हे विषेश !

दलितांवर, दलितांच्या महिलांवर अत्याचार ही पहिली घटना नाही अशा घटना वारंवार होत असतात. खैरलांजीसारख्या घटना कुठे न कुठे होतच असतात फक्त काहीच मोजक्या घटनांना प्रसिध्दी मिळते, पण पिडीतांना न्याय मिळेलच याची शाश्वती नाही. अण्णा हजारे सारखे समाजसेवक, विचारवंत, लेखक, रामदेव बाबाच्या आंदोलनाला चिरडून टाक ताना महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांचा- सरकारचा निषेध करणारे, या विषयांवर कधीच आंदोलन करीत नाहीत. म्हणूनच ते पाखंडी आहेत असे मला नेहमीच वाटते. ही दलितांची लढाई आहे ती त्यांनी एकटयांनीच लढावी असे कदाचित असेल. याचाच अर्थ असा की आपल्या घरातील महिलांची (सर्व महिलांची माफी मागून!) इज्जत गेली तरच यांना अन्याय वाटतो आणि दुसरी स्त्री विटंबनेसाठीच जन्माला आलेली आहे असं यांचं माननं असलं पाहिजे !

 

2 comments:

  1. मित्रा तुझे कथन योग्य आणि चीड़ आणणारे आहे . मात्र मला कळत नाही तुझा सारखा सुशिक्षित माणूस असे अडाणी भाष्य कसे करतो. आण्णा हजारे नि किंवा रामदेव बाबा नि कुठल्या विषयाला धरून आंदोलन केले पाहिजे हे ठरविण्याचा अधिकार तुला कोणी दिला. एखाद्या विषय ची तीव्रता जर तुला अधिक वाटते तर तू स्वत आंदोलना साठी पुढे आला पाहिजे. उगाच शाब्दिक प्रपंच करून तुला जो विषय प्राथमिकतेचा वाटतो त्यावर भारतातले मोठे समाजकारणी काही करत नाही अर्थात ते बदमास आहे असे तोंड सुख घेण्यात काय अर्थ आहे. जातीयता आणि भ्रष्टाचार दोन्ही मुद्दे आप आपल्या ठिकाणी महत्वाचे आहे. कदचित बंधू ला भ्रष्टाचाराच्या लागवडी पासून स्वताला वाचविता आले नसेल म्हणून भ्रष्टाचार वरील सर्व आंदोलन निरर्थक आहे असे तुझे मत झाले असेल. समाजात कोणी पाण्यासाठी काम करतो, कोणी अंधश्रद्द्धा निर्मुलना साठी, कोणी जनावरांसाठी, कोणी कले साठी, कोणी खेळ साठी . हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याला समाजात कसा योगदान द्यायचा आहे. लोकांनी काय करावे हे ठरविण्या आदी त्यांच्या कर्तृत्वाच्या १ टक्के मोठेपणा तरी आपल्या कडे आहे का याचा विचार करावा. बाकी शुभेच्चा ...

    ReplyDelete