माझ्या आईला भारतमाता सावित्रीबाई फुले सामाजीक कार्यकर्त्या पुरस्क ार प्रदान करताना माया जमदाडे मॅडम, सोबत आईला आपल्या तब्बेतीची फिकीर न करता सतत साथ देणा-या फैमिदा शेख व इतर मान्यवर दिसत आहेत. यावेळी धम्मचारी तेजबोधी,भारतमाता सावित्रीबाई फुले विचारमंचाच्या अध्यक्षा स्मिता जाधव, भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष आर.जी. चौकेकर,चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र वाडीकर,विद्रोही सांस्कृतिक चळवळ सिंधुदूर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीचे अध्यक्ष वासुदेव जाधव आदी प्रमुख उपस्थितीत होते.
आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक असा मायेचा कोपरा असतो की त्या ओलाव्यात सारं जग समावून घेण्याची ताकद असते. मुल कितीही मोठं झालं कितीही खोटं निघालं तरी हा ओलवा कायमच असतो.आपली सारीच लेकरं सुखात राहावीत या साठी आईची सततची तळमळ असते. मग ती आई झोपडीतील असेल किंवा एखाद्या राजमहलातील. आपल्या लेकरांसाठी काही वाट्टेल ते सहन करण्यासाठी आई तत्पर असते. आपण ज्यााला जन्म दिला त्यांबद्दल एवढी माया असणे अगदी स्वाभाविकच आहे. पण नात्यागोत्याच्या गोतावळया पलीकडे असलेल्यांबाबतही आईचीच माया लावण्यासाठी मात्र मोठ्ठं काळीज असावं लागतं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांना - मुलांना अशाच प्रकारची माया लावली. महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्वच स्तरावरील समाजघटकांना आईची माया दिली. मायेचा ओलावा आणि माणुसकीचा गहिवर असल्याशिवाय हे शक्य नाही. मला अभिमान वाटतो की मी अशाच आईच्या पोटी जन्म घेतला !
माझी आई ही कधीच न आटलेला मायेचा झरा ! अगदी लहानपणापासून ती तश्शीच आहे. माझ्या मावश्या तिच्या लहानपणीच्या कथा सांगतात तेव्हा तिला समाजसेवेचे, माणुसकीचेआणि मायेचे बालकडू लहानपणापासूनच लाभलेले आहे. माझे आजोबा ( बाप्पा ) आणि आजी ( ताई ) यांकडून तिला हा वारसा लाभलेला आहे. प्रत्येक आई आपल्या बाळाला जसं जिवापाड जपते अगदी तसंच आईने आम्हा भावंडांना जपलेच पण आमच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला दुर्लक्षीत केलेले नाही, प्रोत्साहन दिले नाही , दिलाच तो मार. मी लहानपणी एवढा खोडसाळ होतो की विचारण्याची सोय नाही. कोणतीही गोष्ट आपण करायची आणि अंगलट येईल असे वाटले की दुसऱ्याचे नाव सांगून टाकण्याची माझी खोडी होती. पण माझी खोडी आईच्या चणाक्ष व दक्ष नजरेतून सुटायची नाही. आणि मग ती खोड मोडण्यासाठी आई माया बाजूला ठेवून अशी काही चोपायची की जीवनभराची खोडी मोडून जायची. सुंदर मुर्ती बनविण्यासाठी दगडावर घाव घालावे लाागतात याची तिला चांगलीच जाण असल्याने आम्हाला घडविण्यासाठी तिने घाव घालण्यासही मागेपुढे पाहिले नाही. त्याचाच फायदा आज आम्हाला होत आहे !
माझ्या आईने केवळ आम्हा भावंडांपुरतीच आपली माया सिमीत ठेवली नाही तर सर्वांना माया लावली. आपला तो बाळू आणि दुसऱ्याचा तो काळू अशी आमच्या आईची कधीच भावना न व्हती व नाही. खरेतर तिच्यासाठी सगळेच बाळू, काळू कुणीच नाही ! माझी आई जेवढी मायाळू तेवढीच ती कठोरही. अन्यायाच्या विरुध्द पेटून उठण्याचा तिचा स्वभाव. सापाच्या बिळात हात घालून त्याला बाहेर खेचण्याची हिंमत तिच्यात आहे हे अनेक प्रसंगी दिसून आले. मुंबईमध्ये बेस्टच्या वाहकाने माझ्या मामाला शिवी दिली तेव्हा संतापलेल्या आईने त्या वाहकाच्या कानशिलात लावण्यात मागे पुढे पाहिले नाही !
कोकणातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तालुक्यांतील ग्रामीण भागात युनिसेफ मार्फत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाडयांत तिने काम केले. आम्ही चार भावंडं, नोकरीसाठी मला आणि माझ्या बहिणीला घेवून दोन भावांना वडिलांच्या ताब्यात देवून दुर्गमभागात विनातक्रार काम करीत होती. त्यावेळी तिने सहन केलेल्या हालअपेष्टा मी जवळून पाहिल्यात पण त्याची झळ ना आम्हाला लागू दिली ना अंगणवाडीतील मुलांना . यात वडिलांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्यामुळे तीला अधिकच बळ प्राप्त झाले होते. आई तशी तुटपूंज्या मानधनावरची अंगणवाडी सेविका होती. पण पैशापेक्षा माणसं जोडणे हे आम्हा कुटूंबियांना नेहमीच महत्वाचे वाटले आणि त्यामुळेच माझी आई ही अनेकांसाठी आश्रयदाती बनली. अंगणवाडी सेविका म्हणून मर्यादीत कामे न करता समाजसुधारण्याचा, समाजसेवेचा जो वारसा तिला लाभला होता तोही ती चालवत होती. कोकणातील जातीयता. आजही अनेक ठिकाणी डोकावणारी जातीयता तर त्यावेळी डोकं वर काढूनच होती. पण तीचं डोकं ठेचण्याचं कामही तिने त्यावेळी मोठया धाडसाने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा मिळाल्यानेच तिला हे शक्य होतं. मागास समजल्या जाणाऱ्यांना सार्वजनिक विहिरीचे पाणी भरण्यास मज्जाव केला जायचा. वास्तविक आईला कोणीही मज्जाव करीत नव्हते, पण अन्य महिलांनी आपली व्यथा आईकडे मांडली आणि साऱ्या महिलांना घेवून आईने विहीर गाठली, सर्वांना पाणी भरु दिले. सर्वांचे पाणी होईपर्यंत स्वत: तीथे थांबली. गावातील तथाकथीत सवर्ण तेथे आले त्यांनी ‘बाई तुम्ही हे काय करता ?’ असा जाब विचारला तेव्हा ‘ तुम्ही जे करता तेच मीही करत आहे’ असा जयभीम टोला आईने लगावला. त्याचे पडसाद आजही उमठत आहेत आजही सार्वजनिक विहीर ही सार्वजनीकच राहिलेली आहे. गावातील एका देवळात बौध्द युवतींनी प्रवेश केल्यामुळे ब्राम्हण सामाजातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने त्यांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केला. त्या मुलींनी आईच्या महिलामंडळाकडे तक्रार केली. गावात विविध जातीचे लोक राहातात त्यासर्वांची एक बैठक घेवून त्यांसमोर त्या प्रतिष्ठीतास जाब विचारण्यात आला तसेच सर्वांच्या सह्यांनिशी पोलीसांकडे तक्रार केली. एवढयावरच न थांबता जो पर्यंत शिवीगाळ करणारी व्यक्ती सर्व गावासमोर त्या मुलींची माफी मागत नाही तोपर्यंत गावातील कोणाकडेही बौध्द समाजातील लोकं कामाला जाणार नाहीत असा ठराव करण्यात आला. परिणामी माफी मागण्यात आली आणि सर्व वाद मिटला. आज सर्वच लोकं गुण्यागोविंदाने राहात आहेत. असे अनेक किस्से आहेत.
वेंगुर्ले तालुक्यातील भेंडमळा येथे आईची बदली झाली तेथे मात्र कोणतीही जातीयता दिसली नाही पण आईचे काम थांबलेले नव्हते. याठिकाणी आईला मोलमजूरी करणारे कुटूंब दिसलं. ते होतं कर्नाटकातील हुबळी येथील. आंब्याच्या बागेत काम करण्यासाठी हे कुटूंब आले होते. त्यांची चार पाच मुलं बागेत खेळताना दिसायची. आईने त्या कुटूंबाशी संपर्क साधला. मुलांना शाळेत का पाठवत नाही अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही हातावर पोट असलेली माणसं पोरांना शिकवणं कसे जमेल असा प्रतिप्रश्न पालकांनी केला. शिवाय आमच्या पोरांना कोणी शाळेतही घेत नाही असे त्यांनी सांगितले. त्यावर आईने मी तुमच्या मुलांची जबाबदारी घेते यांना शाळेत पाठवा असे सांगितले. त्यामुलांना आईने मराठी शिकवले. थोडं लिहिता वाचता येवू लागताच त्यांना रामघाट शाळेत प्रवेश मिळवून दिला. आज ती मुलं चांगली शिकली आहेत. सर्वात मोठा मुलगा व्हलप्पा बसप्पा तलवार हा आज दापोली कृषि विद्यापिठात नोकरीस आहे. आंब्याच्या बागेत खेळता खेळता आपण कृषि विद्यापिठात पोहोचला त्याचे सारे श्रेय हा मुलगा माझ्या आईलाच देतो. वेंगुर्ले येथे त्यांचे छानसे घरही आहे. झोपडी पासून ते स्वत:च्या घरापर्यंत त्याला प्रवेश करताना पाहुन माझ्या आईला जो आनंद झाला तो शब्दात सांगणं कठिण आहे.
सासरी कुणा गरीबाच्या मुलीचा छळ होत असेल तर तेथे माझी आई धावून गेली. बांदा येथील दोन मुलींची अशाच जाचातून तीने सोडवण्ूक केली. यावेळी आईच्या मदतीला फैमीदा शेख याही होत्या. मुलींनी आपबीती सांगताच आईने थेट पोलीस ठाणे गाठले. महिला मंडळाच्यावतीने दिलेल्या या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी दोन्ही मुलींची सुटका केली. त्यापैकी एकीचे लग्न गोव्यातील चांगल्या व्यक्तीशी लावून देण्यात आले तर दुसरीने माहेरी येवून नोकरी करणे पसंत केले. आता दोन्ही मुली सुखात आहेत.
कितीतरी निराधार, वृध्द स्त्री पुरुषांना आईने शासकीय मदत मिळवून दिली, हे सर्व करीत असताना कोणत्या प्रसिध्दी किंवा आर्थीक लाभाची अपेक्षा तीने केलेली नाही. एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे तिचे काम आजही सुरुच आहे. हे करीत असताना तिला होत असलेला त्रास मी अगदी जवळून पाहिला आहे. पण तिने कधी त्याबाबत तक्रार केलेली नाही. आभाळ माया म्हणजे काय असे जर कुणी विचारले तर मी तरी माझ्या आईचेच नाव सांगेण. सुहासिनी रुपाजी तेंडोलकर !
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य हे महान आहे. त्यातुलनेत माझ्या आईने केलेले कार्य फारच कमी आहे. परंतु सावंतवाडी येथील भारतमाता सावित्रीबाई फुले विचारमंच यांनी तिला सावित्रीबाई फुले पुरस्क ार देवून सन्मानित केले आहे. आईने केलेल्या कार्याची दखल घेवून हा पुरस्क ार तिला देण्यात आलेला आहे, पुरस्क ारासाठी तिने कधीच काम केले नाही, एकमात्र खरे की सावित्रीबाईच्या नावाने मिळालेला हा पुरस्क ार आईलाच नाही तर आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे !
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य तर महान आहेच, पण आईने केलेले कार्यही सर्वांना प्रेरणा देणारेच आहे.
ReplyDeleteक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य तर महान आहेच, पण आईने केलेले कार्यही सर्वांना प्रेरणा देणारेच आहे.-अरुण
ReplyDeleteBhau Aaila Salaam....
ReplyDeleteGreat!khup-khup Subhechya.aai kharya aarthane Savitrimaaiche kam karte aahe.aanek jan Savitrimaaicha aaw aantat,pan aai karmane Savitrimaai aahe.tyani aankhin eak karayala pahije hote,Bandhula Changla badun kadhyala pahije hota.suta sarkha saral zala aasta.samjalna bandhu ka te?
ReplyDelete
ReplyDeleteआई ला खूप खूप शुभेच्छा ... आणि हार्दिक अभिनंदन