टाईमपाससाठी ‘रामायण’ ?
शाहिनबागमध्ये बसलेल्या नागरीकांनी शेवटी सुमारे 105 दिवसांनी
आपलं आंदोलन कोरोनामुळे गुंडाळलं, त्यांच्या मागणीच्या सुरात सूर घालून देशभर ‘शाहिनबागा’
तयार झाल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात सीएए, एनआरसी वगैरे रद्द करण्याची मागणी जनतेतून
झाली मात्र शासनाने ती ना ऐकली, ना तिची दखल घेतली. एक खरं की, विरोधक असोत वा समर्थक,
सर्वांच्याच कानावर ही बाब होती . मात्र ‘रामायण किंवा महाभारत पुन्हा सुरु करा’ अशी
मागणी करताना कुणीही दिसलं नाही. तरीही सुचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी
लोकांची मागणी आली म्हणून पुन्हा या मालिका दुरदर्शनवरुन सुरु करत असल्याचे सांगितले.
आता पर्यावरण मंत्री म्हणून जावडेकर साहेबांचा आणि बागेचा संबंध येतोच त्यामुळे एखाद्या
‘रेशीम किड्याची’ मन की बात त्यांच्या कानावर पडली का ? तपासावे लागेल !
कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे, लोकं आपआपल्या
घरी बसून बोअर झाली आहेत, त्यांना खरं तर बौद्धीक ज्ञान, मानसिक ताकद वाढविणारं ज्ञान,
वैज्ञानिक चिंतन करण्याची संधी अशा देशहिताच्या गोष्टींत गुंतवता आलं असतं पण त्यांचा
टाईमपास करण्यासाठी जावडेकर साहेबांनी पुन्हा ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ऐशीच्या दशकात
गाजलेल्या मालिका सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या पाहत असतानाचा आपला फोटोही
ट्विटरवर टाकला. त्याला पुर्वाश्रमीच्या भाजपाच्या आयटीसेलवर ‘ट्रोल’ म्हणून काम केलेल्या
व त्यानंतर भाजपा व आयटीसेलची पोलखोल करणारं ‘आय एक ट्रोल’ हे पुस्तक लिहिणाऱ्या स्वाती
चतुर्वेदी यांनी लागलीच ट्रोल केलं. त्यांनी प्रकाश जावडेकर यांची बरोबरी ‘ब्रेड नाही
तर केक खा’ असं सुचविणाऱ्या अँटोनेट यांच्याशी केली. फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची
पत्नी मेरी अँटोनेट यांनी राज्यक्रांतीच्या आधी उपाशी मरणाऱ्या जनतेला हा ‘केक खाण्याचा’
उद्दाम सल्ला दिला होता. भारतात कोरोनाने नागरीक त्रस्त आहेत, सर्वसामान्य नागरीक भयभीत
होत आहेत, संपूर्ण आरोग्य यंत्रणा संरक्षक ढाली उपलब्ध नसल्याने हाताला फडकं गुंडाळून
लढत आहेत, गरीब जनता जगण्याची धडपड करण्यासाठी उपाशी तापशी गावाकडे पळत आहे, आणि अशा
परिस्थिती निर्लज्जपणे आपल्या घरात टिव्ही पाहत बसणं आणि ‘तुम्ही बघून त्याचे फोटो
काढा असं सांगणं’ हे खरंतर अँटोनेट सारखंच आहे. चतुर्वेदींचा टोला असा बसाला की जावडेकरांनी
आपलं ट्विट डीलिट केलं. असो.
पण ‘रामायण’ हे टाईमपास म्हणून दाखवणं हे आपल्याला नाही पटलं
ब्वा ! हिंदु धर्मात रामायणाला धार्मिक ग्रंथ म्हणून मान्यता असताना त्यावर आधारीत
मालिका टाईमपास म्हणून दाखविणं म्हणजे त्या धार्मिक ग्रंथाचा नि साक्षात रामचंद्राचाही
अपमानच वाटतो. त्यात आता जमाना सोशल मिडीयाचा. अशात कोणा कोणाचं तोंड धरणार ? रामाची,
रामायणाची, कृष्णाची, महाभारताची चिकित्सा किंवा टिंगल टावळी करण्याची आयती संधीच सोशल
मिडीयाविरांना मिळाली. एकप्रकारे हे रामचंद्रांना अडचणीत आणण्यासारखंच नाही का ? हे
टवाळखोरांना प्रवृत्त करणेच नाही का ? आजच्या जमान्यात विज्ञानवाद- समानतावाद फोफावलाय,
स्त्रीयाही बोलु लागल्या आहेत, त्यांनी जर कैकीयीची बाजू घेतली तर ? रामाने सितेला
गरोदर असताना सोडून दिलं याचं भांडवल केलं तर ? रावणाचीच बाजू बरोबर म्हणणारा वर्गही
आहेच, याशिवाय हनुमान आणि अन्य वानर सेना, महाभारतातील कर्ण, पांडव यांच्याबद्दल काही वैज्ञानिक प्रश्न उपस्थित केले
तर ? हा अपमानच होईल की नाही ! कोणती बुद्धी झाली नि सरकारने हा निर्णय घेतला कोण जाणे.
बरं, कोरोनाच्या संकटसमयी ‘राम-कृष्ण’ कुठे गेले ? असे सवाल यापूर्वीच विचारले गेले
आहेत आता तर सरकाने या दोन महाकाव्य विरांना अडचणीत- गोत्यात आणलं आहे असंच वाटतं.
पण ज्या अर्थी रामायण सुरु करण्यात आलं आहे त्याअर्थी केवळ
टाइमपास एवढाच हेतु नसावा. त्यातून काही संदेश देण्याचा उद्देश असावा. आता मी माध्यमांमधला
आणि जनसंवादातील माणूस ! त्यामुळे अशा गोष्टींकडे केवळ टाईमपास म्हणून बघण्याची मला
परवानगीच नाही. कारण जनमाध्यमांचा लोकमानसावर
कसा परिणाम होतो याचा थोडाफार अभ्यास आहेच
गाठीला. जुने संदर्भ चाळले तर लक्षात येतं की, जानेवारी 1987 ते जुलै 88 या दिड वर्षाच्या
काळात 78 भागात गुजरातमध्ये तयार झालेल्या ‘रामायण’ या टिव्ही मालिकेच्या माध्यामातून
घराघरात रामलल्ला पद्धतशीरपणे पोहोचविला गेला. परिणामी संपूर्ण देशात रामाप्रती लोकभावना
जागृत व तिव्र झाल्या. कुणी स्वत:ला राम मानू लागला तर कुणी वानरसेने सारखे वागू लागले.
त्यानंतर झालेल्या निवडणुकीत (1989) ‘राममंदिर’ हाच प्रचाराचा प्रमुख मुददा होता त्यात
भारतीय जनता पार्टीला एकूण 85 जागा मिळाल्या. त्याअगोदर 1984 ला केवळ दोनच जागा होत्या.
1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी ‘रथ यात्रा’ काढली. ‘विवादीत जागेत राममंदिर व्हावे’
म्हणून ही यात्रा होती. या रथयात्रेचे स्वागत ठिकठिकाणी घंटा व थाळ्या वाजवून (22 मार्चची
घंटोपोलॉजी आठवा !) करण्यात आले, परिणाम असा झाला की त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपाला
उत्तर प्रदेशची सत्ता मिळाली आणि लोकसभेतील 120 जागा मिळाल्या. पूढे लागलीच 1992 ला
देशभरातून ‘जागृत’ झालेले करसेवक आयोद्येला गोळा झाले आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त केली
गेली, देशात दंगली उसळल्या, त्यात सुमारे दोन हजार लोकं मारली गेली (कोरोनाने आतापर्यंत
भारतात 25 लोकं मृत्युमुखी पडलीत ! ) त्यांनतर भाजपाला राम पावला आणि ‘अच्छे दिन’ येत गेले. 1996,98 व 2000 भाजापाची भरभराट
झाली आणि वाजपेयी तीनवेळा प्रधानमंत्री बनू शकले. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, पत्रकार
रामचंद्र गुहा हेही त्यांच्या ‘India After Gandhi’ या संशोधनपर पुस्तकात याचे थोडे
अधिक श्रेय ‘ रामायण’ या मालिकेला देतात. या पार्श्वभूमिवर पुन्हा ‘ रामायण’ दाखविण्यामागे
खरा हेतु काय असावा हा प्रश्नच आहे !
(ता.क. 2022 मध्ये उत्तर प्रदेशसह देशातल्या सात राज्यांच्या
निवडणुका आहेत.)